इचलकरंजी
रस्ता ओलांडताना मोटरसायकलींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात विजय निळकंठ कऱ्हाडकर (वय ५५, रा. खंजिरे मळा) हे ठार झाले. या अपघातात शंकर एन. मुर्गेसन (४४, रा. यड्राव) हे गंभीर जखमी झाले. इचलकरंजी-सांगली रोडवर मारुती मंदिरासमाोर हा अपघात घडला. याची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.
पोलिसांनी सांगितले की, खंजिरे मळ्यात राहणारे विजय कऱ्हाडकर हे खोतवाडीतील एका हॉटेलात कामास होते. रात्री काम आटोपून ते मोपेडवरुन (एमएच ०९ बीयू ०३९४) इचलकरंजीच्या दिशेने येत होते. सांगली नाका परिसरातील मारुती मंदिरासमोर पान खाण्यासाठी ते थांबले होते. रस्ता ओलांडताना इचलकरंजीहून यड्रावच्या दिशेने निघालेल्या शंकर मुर्गेसन यांच्या युनीकॉर्न मोटरसायकलशी (एमएच ०९ पीपी ५३६५) समोरासमोर जोराची धडक झाली. त्यामध्ये कऱ्हाडकर व मुर्गेसन हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर जखमींना नगरसेवक उदयसिंग पाटील व माजी नगरसेवक भाऊसाहेब आवळे यांनी तातडीने इंदिरा गांधी सामांन्य रुग्णालयात दाखल केले. पण कऱ्हाडकर यांची उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. मुर्गेसन यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुर्गेसन हे शिक्षक आहेत. कऱ्हाडकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. अपघातात दोन्ही मोटरसायकलींचा चक्काचूर झाला.